घरोघरी फडकला भारतीय ध्वज; विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानाला शनिवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. नागरिकांनी घरोघरी भारतीय ध्वज फडकावून सलामी दिली. त्याचप्रमाणे यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रीय ध्वज फडकविला तसेच विविध उपक्रम राबविले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या पनवेल येथील निवासस्थानी भारताचा ध्वज फडकविला. या राष्ट्रीय उत्सवात तमाम नागरिकांनी सहभागी व्हावे. राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान राखून आपापल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत महाड येथील दिवंगत नेते राजेय भोसले यांच्या घरी देशाचा राष्ट्रीय ध्वज फडकवून मानवंदना दिली. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, अविनाश कोळी, राजेश मपारा, मिलिंद पाटील, सोपान जांबेकर, जयवंत दळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.