पाटण ः प्रतिनिधी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना, भाजप, रिपाइं व महायुतीचीच सत्ता येणार असाही विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या भाषणात आजही अहंकार दिसतो. महापुरुषांचे विचारही काँग्रेस विसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर यांना पडला एवढेच नाही, तर महात्मा गांधी यांच्या विचारांचाही काँग्रेसला जपता आला नाही, अशीही टीका उदयनराजे भोसले यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी श्रीनिवास पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. श्रीनिवास पाटील म्हणतात तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मागणी करतात उमेदवारी मलाच हवी. त्यानंतर मी आरशात पाहणेच सोडून दिले, असे म्हणत त्यांनी पाटील यांची खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी त्यांचे कौतुक केले. आम्ही विचारांनी एकत्र आलेली माणसे आहोत. त्यामुळे कायमस्वरूपी एकत्र राहू, आमच्या एकत्र येण्यामागे कोणताही स्वार्थ नाही, असेही सांगून उदयनराजे म्हणाले की, स्वार्थापोटी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळेच 15 वर्षांत ते जनतेचे काहीही भले करू शकले नाही. त्यांचे विचारही वेगळे आहेत, ते स्वार्थापोटी एकत्र आल्याने त्यांची वाताहत झाली. हे दोन्ही पक्ष विचारांनी बांधलेले नाहीत. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा माझी अवस्था त्यांच्यासाठी पिंडीवरच्या विंचवासारखी होती. मला मारता येत नव्हते आणि हाकलताही येत नव्हते. म्हणून मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलो. जनतारूपी महादेव माझ्यासोबत आहे. मी कशालाही घाबरत नाही. माझे तोंड कुणीही बंद करू शकत नाही, असेही उदयनराजे यांनी भाषणात स्पष्ट केले.