Breaking News

अलिबागचा सफेद कांदा उरण बाजारात

उरण :अलिबाग तालुक्यातील गुणकारी सफेद कांदा उरण शहरात दाखल झाला असून कांद्याला मागणी वाढली आहे. उरणवासीय कांदा खरेदी करताना दिसत आहेत.भातशेतीची कापणी झाल्यानंतर काहीच दिवसांनी सफेद कांद्याची लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यात कांद्याचे पीक येते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अलिबाग, पेण, वडखळ नाका आदी ठिकाणी सफेद कांद्याच्या माळा विकावयास आलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे पेण-अलिबाग रोडवरही सफेद कांद्याच्या माळा विकताना शेतकरी दिसत आहेत. अलिबाग तालुक्यातील गुणकारी सफेद कांदा उरण बाजारात विकावयास आला आहे. सफेद कांदा गुणकारी, औषधी असल्याने त्याचप्रमाणे चवीला गोड, पोट साफ होत नसेल तर कांदा व गूळ देतात. त्यामुळे कांद्याला मागणी वाढली आहे. सदर कांदा जानेवारी ते एप्रिलपर्यंत बाजारात विकला जातो. उरण बाजारात हा कांदा राजपाल नाका, गांधी चौक, बाजारपेठ, सिटीझन कॉलेज  आदी ठिकाणी विकावयास आला आहे.अलिबाग तालुक्यातील मानेपुते, तळवली, खंडाळा, नेवली, कार्ला खिंड, वाडगाव, खानाउसर, सानगोटी आदी गावांमध्ये सफेद कांद्याची लागवड केली जाते, असे रांजनखार गावातील रसिका मंगेश म्हात्रे, कावाडे गावच्या नंदिनी प्रशांत म्हात्रे  व रोशनी रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले.सफेद कांद्याची लहान माळ 80 रुपये, तर मोठ्या कांद्याची माळ 100 ते 130 रुपये या दराने आम्ही विकतो. दिवसेंदिवस कांद्याला मागणी वाढली आहे, असे कांदे विक्रेती रसिका म्हात्रे यांनी सांगितले.दरवर्षी सफेद कांदे उरण बाजारात विकावयास येतात. सफेद कांदा औषधी व गुणकारी तसेच चवीला गोड असल्याने आम्ही तो विकत घेतो. वर्षातून एकदाच खायला मिळणारे गुणकारी कांदे आम्ही खरेदी करून ठेवतो. पावसाळ्यात त्याची चव काही औरच लागते. पोट साफ होत नसेल तर सफेद कांदा खायला देतात.-कांचन पाटील, उरण

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply