पनवेल : सहलीनिमित्त पनवेलवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेल्या शेकडो पर्यटकांची एका ट्रॅव्हल्स एजन्सीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुक्यातील 350 पर्यटक पनवेलवरून चेन्नई या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांची पुढील प्रवासाची श्रीलंकेची तिकिटे रद्द झाल्याचे कळल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेकडो पर्यटकांना विमानतळावर 24 तास ताटकळत थांबावे लागले.भारतयात्रा ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत पनवेलमधील कोण गावातील सुरेश महाराज पाटील यांच्या पुढाकाराने सहलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतयात्रा या कंपनीचे मालक नीरज कपूर व किसन कपूर हेदेखील 350 पर्यटकांसोबत होते. 21 फेब्रुवारीला रात्री 11.30 वाजता पनवेलवरून रेल्वेने पर्यटक चेन्नईला रवाना झाले. दुसर्या दिवशी ते चेन्नईला पोहचले. तिसर्या दिवशी चेन्नई शहरात फिरल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम करून चौथ्या दिवशी 24 फेब्रुवारीला श्रीलंकेला रवाना होण्यासाठी सर्व जण चेन्नई विमानतळावर पोहचले. 350 जणांपैकी 108 जण श्रीलंकेला रवानाही झाले, मात्र उर्वरित 242 पर्यटकांची तिकिटे रद्द झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. संपूर्ण दिवस विमानतळावरच ताटकळत बसूनही श्रीलंकेसाठी तिकिटाचे नियोजन न झाल्याने संतप्त पर्यटकांनी आयोजकांना जाब विचारला. आयोजनात पुढाकार घेतलेले सुरेश महाराज 108 जणांसोबत श्रीलंकेला रवाना झाल्याने विमानतळावरील पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. त्यांनी भारतयात्रा कंपनीचे मालक किसन कपूर यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.कपूर यांनी नव्याने तिकीट काढत असल्याचे सुरुवातीला सांगितले, मात्र काही वेळात कपूरही विमानतळावरून गायब झाला. त्याने फोनही बंद ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. या 242 जणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती, तर अनेक जण पहिल्यांदाच विमानात बसणार असल्याने आनंदात होते, मात्र घडलेल्या प्रकारामुळे अनेकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आयोजनात पुढाकार घेतलेल्या सुरेश महाराज पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी श्रीलंकेवरून परतीचा प्रवास करीत चेन्नई विमानतळ गाठत 242 प्रवाशांना रेल्वेने पुन्हा पनवेलला आणले. दरम्यान, संतप्त झालेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.श्रीलंकेत 4 दिवस 5 रात्री अशी सहल नेण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 22 हजार रुपये आकारण्यात आले होते. 350 पर्यटकांप्रमाणे ही रक्कम सुमारे 77 लाख रुपये होते. सुमारे 242 जणांना चेन्नईवरूनच परतीचा प्रवास करावा लागला. चेन्नईवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेले 108 पर्यटक 3 मार्च रोजी पनवेलमध्ये दाखल होणार आहेत.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …