Breaking News

मनमोहन सिंग सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली -पीयूष गोयल

पुणे : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती 2014मध्ये सत्ता आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. या सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशांतील उद्योग आपल्याकडे येत आहेत. याआधी अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सिंग यांच्यावर निशाणा साधला.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजप सरकारच्या कार्यशैलीवर टीका केली. या टीकेचा पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पीयूष गोयल यांनी समाचार घेतला. गोयल म्हणाले की, सिंग यांच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि उद्योग व्यावसायिकांचा कधीही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे असंख्य तरुणांच्या हातचा रोजगार गेला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. याच सरकारच्या काळात चारा, कोळसा, सिंचन, आदर्श यांसह अनेक घोटाळे देशभरात झाले.

यामुळे खर्‍या अर्थाने अर्थव्यवस्था कोलमडली. हे सर्व होत असताना सिंग यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. वेळीच त्यांनी भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई केली असती, तर आज हे दिवस त्यांना पाहावे लागले नसते. त्यामुळे आमच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा तुमच्या सरकारमध्ये तुम्ही काय केले त्यावर बोला, अशी मागणी करीत गोयल यांनी सिंग यांच्यावर हल्लाबोल केला.

देशाची अर्थव्यवस्थाच अडचणीत असल्याचे अभिजित बॅनर्जी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. मागील पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम भाजप सरकारने केले, असे सांगून अभिजित बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असून, त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचे कौतुक केले होते, परंतु ती योजना सपशेल अपयशी ठरली आणि काँग्रेसलादेखील जनतेने नाकारले, असे म्हणत गोयल यांनी त्यांनाही धारेवर धरले.

Check Also

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तपरदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply