Breaking News

खोपोलीत कुस्ती संकुलाचे उद्घाटन

खोपोली : प्रतिनिधी

येथील शान व रायगड जिल्ह्यातील कुस्ती महर्षी अशी ओळख असलेले दिवंगत भाऊसाहेब कुंभार यांच्या कार्याचा गौरव म्हणून खोपोलीत त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उद्घाटन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू व राज्यस्तरीय पंच मारुती आडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जगदीश मरागजे, कबड्डीपटू अनिल सावंत यांच्यासह अन्य मान्यवर कुस्तीपटू व क्रीडापटू उपस्थित होते.

क्रीडा शिक्षक व कुस्तीपटू भाऊसाहेब कुंभार यांचा वारसा चालविणारे राजाराम कुंभार यांनी भाऊसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतःच्या जागेत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त कुस्ती संकुल उभारले आहे. मारुती आडकर व राजाराम कुंभार यांनी मुंबई विद्यापीठ, आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय कुस्तीपटू घडविले आहेत. राजाराम कुंभार हे स्वतः कुस्तीतील सुवर्णपदक विजेते कुस्तीगीर आहेत. त्यांनी  आपले आदर्श भाऊसाहेब व खोपोलीतील कुस्तीचा वारसा कायम ठेवण्यासाठी या संकुलाची निर्मिती केली आहे. यात मुले व मुलींसाठी स्वतंत्र वेळेत उत्तम मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली कुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खोपोलीत नगर परिषद तालीम शाळेत लाल मातीतील कुस्ती आखाडा आहे, मात्र त्याची दुर्दशा झाली आहे. म्हणून भावी कुस्तीपटू घडविण्यासाठी कुस्ती संकुल निर्माण केल्याचे राजाराम कुंभार यांनी या वेळी सांगितले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply