पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप दक्षिण भारतीय सेलच्या वतीने गुरुवारी नवीन पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर दक्षिण भारतीय पोशाखात उपस्थित होते. आमदार ठाकूर यांना विविध घटकातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, विविध समाजातील नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. पनवेल परिसरात नोकरीधंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास आलेल्या दक्षिण भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे.नोकरीधंद्यासोबत ते पनवेल परिसरातील राजकारण आणि समाजकारणात देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असून भाजपच्या दक्षिण भारतीय सेलमार्फत पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्य केले जात आहे. नवीन पनवेल परिसरातील शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात आमदार ठाकूर यांनी नेहमीच पाठीशी उभ्या राहणार्या दक्षिण भारतीय मतदारांशी संवाद साधून आपल्यावर टाकण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. भाजप दक्षिण भारतीय सेलच्या वतीने आयोजित मेळाव्यात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासोबत नगरसेवक संतोष शेट्टी, भास्कर शेट्टी, तसेच लोकप्रतिनिधी व दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.