Breaking News

पनवेलमध्ये 12 मतदान केंद्र संवेदनशील

पनवेल ः बातमीदार

188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 12 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. यात खारघर येथील 7, तर पनवेल येथील 5 मतदान केंद्रांचा समावेश आहे. खारघर येथील डीएव्ही स्कूल, ग्रीन फिंगर शाळा, सुधागड एज्युकेशन शाळा, सुधागड एज्युकेशन, कोपरा समाज हॉल, रेड क्लिप स्कूल खोली क्र. 1 खारघर, रेड क्लिप शाळेच्या पार्किंगमध्ये तयार केलेल्या मतदान केंद्राची खोली क्रंमांक 3, तर पनवेल महापालिका हद्दीतील सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, चांगू काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल, प्राथमिक मराठी शाळा पोदी, पीर करमअली शहा उर्दू प्राथमिक शाळा पनवेल, याकूब बेग हायस्कूल पनवेल या 12 केंद्रांचा संवेदनशील केंद्रात समावेश होतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त म्हणजेच 576 मतदान केंद्र असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक यंत्रणेसंदर्भात माहिती दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील एकूण 12 मतदान केंद्र संवेदनशील आहेत, या संवेदनशील केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मायक्रोऑब्जर्व्हरची व्यवस्था केली असून, येथे सीसीटीव्ही लावून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सीपीएफचा बंदोबस्त देखील या केंद्रावर नेमण्यात येणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे, तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी व्हीके हायस्कूल येथे पार पडणार आहे. पनवेलमध्ये एकूण 927 मतदार दिव्यांग व अंध, मूकबधिर आहेत. यात 348 दिव्यांग, 143 अंध मतदार, 42 मूकबधिर मतदार व इतर 394 असे एकूण 927 मतदार आहेत. 576 मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच असे तीन हजार कर्मचारी नेमण्यात येणार आहेत, तर प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे अशा जवळपास 600 पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. व्ही. के. हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट करण्यात येणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply