अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलीस दलातर्फे सोमवारी (दि. 21) पोलीस शहीद स्मारकास पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून, तसेच मानवंदना देऊन पोलीस शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी पोलीस दलातील 10 जवान गस्त घालीत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याला कडवे प्रत्युत्तर देणार्या भारतीय जवानांना 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी वीरगती प्राप्त झाली. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून, शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे सोमवारी पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम पार पाडला. पोलीस शहीद स्मारकास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक अजित गवळी, जेल अधीक्षक पाटील, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, वाहतूक पोलीस निरीक्षक एस. एच. वर्हाडे, जिल्हा विशेष शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, प्रतिष्ठित व सामान्य या वेळी उपस्थित होते. या वेळी सन 2018-2019 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या एकूण 292 शहिदांना हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार दिनेश बिर्जे यांनी वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार दिनेश बिर्जे यांनी केले. हुतात्मा परेडकरिता परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय भास्कर शेंडे, प्लाटून नं. 1 कमांडर कल्याण शाखा पोलीस निरीक्षक साबळे, प्लाटून नं. 2 कमांडर आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मा. शा. पाटील असे एकूण 3 अधिकारी व 40 पोलीस जवान, पोलीस बँड पथक यांनी मानवंदना दिली.