मुरूड : प्रतिनिधी
परतीचा पाऊस मुरूड तालुक्याला झोडपत असून, हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. मुरूड तालुक्यात सलग तीन दिवस कोसळणार्या पावसामुळे कापणी झालेली भात पिके वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या परतीच्या पावसामुळे 15 ते 20 टक्के भातशेती बाधित झाली आहे. मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत खूप पाऊस झाला आहे. तुरळक ठिकाणी भातपिकावर करपा रोग पडल्याचा अपवाद वगळता सर्वत्र भाताचे पीक उत्तम तयार झाले होते. काही शेतकर्यांनी तर आपल्या हळव्या वाणाच्या भात पिकाची कापणीही केली होती, मात्र परतीच्या पावसाने कापलेली भातपिके पूर्णतः वाया गेली आहेत. पावसात भिजल्याने पेंढादेखील गुरे खाऊ शकणार नाहीत, अशी स्थिती निर्माण आहे.
गुजरात कोलम, जया, रत्ना, ज्योतिका या हळव्या वाणाची भात पिके 90 ते 100 दिवसामध्ये तयार होतात. दाणा तयार झाल्यानंतर या पिकांची कापणी केली नाही तर दाणा झडतो. त्यामुळे पावसाची अटकळ असूनही तयार झालेली भातशेती कापण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
-दत्ता मांदाडकर, शेतकरी, शिघ्रे, ता. मुरूड
मुरूड तालुक्यातील शीघ्रे ते खारआंबोली परिसरातील कापलेले भातपीक शेतात सुकण्यासाठी ठेवले असता पावसात भिजून ओले झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक प्रकिया पूर्ण होताच कृषी खात्याचे कर्मचारी प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करतील. त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.
-सुरज नामदास, तालुका कृषी अधिकारी, मुरूड