मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत
पनवेल ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, तर पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात 130, तर तालुक्यात कोरोनाचे 168 रुग्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यात आता इतर तालुक्यात नवीन रुग्ण नसल्याने एकूण रुग्णांची संख्या 190 झाली आहे.
कामोठे येथे आठ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सेक्टर 6मधील दोन कुटुंबांतील पाच व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबप्रमुखांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. सेक्टर 11मधील आशियाना कॉम्प्लेक्समधील व्यक्ती चेंबूरला जैन हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी गेली असता तिला संसर्ग झाला असावा. सेक्टर 35मधील संकल्प सोसायटीतील महिलेचा पती बेस्टमध्ये चालक आहे. त्याच्यापासून तिला संसर्ग झाला आहे. कळंबोलीतील 58 वर्षीय व्यक्ती गोवंडी डेपोत वाहक आहे. खारघर घरकुल सेक्टर 15मधील एक महिला किडनीच्या उपचारासाठी नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात गेली होती. खारघर 35 ई मधील जयानी बिल्डिंगमधील महिलेला कोरोनाची बाधा झाली असून तिच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना याअगोदर कोरोनाची बाधा झाली होती.
पनवेलमधील पारिजात सोसायटी उरण नाका येथील 37 वर्षीय व्यक्ती ठाण्याला टीसीएस कंपनीत कामाला आहे. तिला त्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. नेरूळ येथील मीनाताई हॉस्पिटलमध्ये नर्स असणार्या पनवेलच्या तुळशीधाम सोसायटीत राहणार्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेलच्या 52 बंगलोमधील परमेश्वरी निवासमधील महिला कोरोनाबाधित झाली आहे. ती नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. नवीन पनवेल सेक्टर 16 मधील पोदी नंबर 2मध्ये राहणार्या नवी मुंबई महापालिकेतील हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार असणार्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सेक्टर 4 मधील पुष्पमाला सोसायटीतील दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या घरातील व्यक्ती यापूर्वीच पॉझिटिव्ह आली आहे. गुरुवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1284 जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी 21 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी 87 जणांवर उपचार सुरू असून 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले, तर आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी सहा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये करंजाडे सेक्टर आर-1 येथील सविता बिल्डिंगमधील आणि सेक्टर 4मधील मैथिली होम्समधील महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आराध्या रेसिडेन्सीमधील मुंबई महापालिकेत काम करणार्या 54 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. उलवे सेक्टर 5मधील मोरेश्वर सोसायटीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणार्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. पालीदेवद सुकापूर येथील बालाजी लाइफ स्टाइलमधील पोलीस कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विचुंबे येथील गंगा रिजेन्सीमधील व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. त्याला चहावाल्यापासून संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत ग्रामीणमध्ये 155 जणांची तपासणी करण्यात आली असून 20 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. कोरोनाच्या 38 रुग्णांपैकी पाच जण बरे झाले आहेत. रायगड जिल्ह्यात गुरुवारी पनवेल सोडून इतर तालुक्यांत नवीन रुग्ण नसल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 190 झाली आहे.