Tuesday , March 21 2023
Breaking News

मोदींच्या हाती देश सुरक्षित

खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन

कर्जत : बातमीदार

यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी असून, मागील पाच वर्षे आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित असल्याचे जगाने पाहिले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे. त्यासाठी आपणही मला साथ द्या, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 15) केले. आवळस येथील प्रचार फेरीमध्ये आयोजित चौकसभेत ते बोलत होते.

खासदार आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सोमवारी कर्जत तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी खासदार बारणे यांनी पळसदरी येथे श्री स्वामी समर्थ यांच्या मठात जाऊन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर कर्जत तालुक्यातील बीड जिल्हा परिषद गटातील गावांना भेटी देताना आवळस येथे चौकसभा झाली.

या दौर्‍यात खासदार बारणे यांच्या समवेत भाजपचे नेते माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, आरपीआयचे कोकण संघटक मारुती गायकवाड, तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, शिवसेना विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संघटक राजेश जाधव, जिल्हा सल्लागार भरत भगत, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, पाच वर्षे मी मतदारसंघात संपर्क ठेवून आहे. या काळात केवळ जनतेच्या सुखदुःखातच सहभागी झालो नाही, तर देशाच्या लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक प्रश्न मांडण्याचा विक्रमदेखील तुम्ही मतदारांनी विश्वास दाखविल्यामुळे केला. कर्जत विधानसभा मतदारसंघ आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वांत लहान असूनदेखील सर्वाधिक म्हणजे जवळपास पावणेतीन कोटींचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मला कर्जतमधून मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी आवळस गावाला शिवसेनेची परंपरा आहे. या गावाने सतत महायुतीचा विचार केला आहे, असे सांगितले; तर शिवसेना विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर यांनी आपल्याला 2014ची परंपरा कायम राखायची असून, बीड जिल्हा परिषद गटात आपल्याला खासदारांना पुन्हा एकदा मताधिक्य द्यायचे आहे, असे म्हटले.

आवळस येथील सभेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी कडाव, कशेळे, कळंब परिसरातील गावागावांत प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि विजयाचे आवाहन केले.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व नाही

या वेळी विरोधकांचा समाचार घेताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मावळमधील राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्यासोबत कोणतीही स्पर्धा करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे ना नेतृत्व, ना कर्तृत्व, ना वक्तृत्व. असे असतानादेखील ते आपला राजकीय वारसा ठरविण्यासाठी निवडणूक लढवत आहेत, पण ही देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक असून, पवार कुटुंबाचा वारस ठरवणारी बारामतीमधील नक्कीच नाही.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply