रांची : वृत्तसंस्था
झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. रांचीमध्ये मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत सर्व सहा विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजपत औपचारिकरीत्या प्रवेश केला. यामध्ये माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत यांच्या व्यतिरिक्त मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानुप्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांचा समावेश आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजप हा विरोधी पक्षांच्या तंबूतील अनेक नेते पक्षात आणू शकतो. पक्षाने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. मुख्यमंत्री रघुबर दास सध्या जन आशीर्वाद यात्रेद्वारे जनसंपर्क कार्यक्रमात व्यस्त आहेत.