10 हजारांवर कर्मचार्यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 10 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (दि. 23) दिली. गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, 269 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदारसंघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी या वेळी केली जाते. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जाणार आहेत. सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. स्ट्राँग रूम, तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, तसेच स्ट्राँग रूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करण्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.