सातारा ः प्रतिनिधी
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रात कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक पवार यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात अखदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्राध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 22) नवलेवाडीत लोकसभेच्या मतदान यंत्रात कोणतेही बटण दाबले, तरी मत कमळाला जात होते याबाबत राष्ट्रवादीचे दीपक पवार व आमदार शशिकांत शिंदेंसह अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मतदान यंत्र बंद करून ते सील केले होते. त्यानंतर दुसरे मतदान यंत्र लावून मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. संध्याकाळी यावर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सर्व प्रकाराची छाननी करून संबंधित दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक पवार यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नवलेवाडी येथील मतदान मशीनबाबतच्या तक्रारीबाबत राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्यास सांगितले, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे या मतदान केंद्रावरील प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. संबंधितांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून, अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.