पनवेल : प्रतिनिधी
दिवाळी खरेदीसाठी पनवेल शहरात आलेल्या 30पेक्षा जास्त जणांचे एका पिसाळलेल्या श्वानाने लचके तोडल्याची घटना रविवारी
(दि. 27) दुपारी घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले बहुसंख्य जण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात
दाखल आहेत.
सुटीचा दिवस आणि नरकचतुर्दशीचा मुहूर्त साधून रविवारी दुपारी अनेक जण कुटुंबासह पनवेलमध्ये खरेदीसाठी आले होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ आपली वाहने उभी करून आजूबाजूच्या दुकानातून खरेदी केल्यावर लोक निघण्याच्या तयारीत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुले, महिला, वृद्ध व दुचाकीस्वारांच्या पायाचे, तर कोणाच्या हाताचे लचके तोडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
पिसाळलेल्या कुत्र्याने तहसीलदार कार्यालयापासून रस्त्यावरून चालणार्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. तेथून तो बापटवाडा, मार्केट, भारत हॉटेल नाकामार्गे मिडलक्लास सोसायटीकडे गेल्याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांनी दिली. या कुत्र्याच्या मागावर कर्मचारी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.
श्वानदंशाने बाधित झालेले 25पेक्षा जास्त रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. खाजगी रुग्णालयात किती रुग्ण गेले आहेत, याचा आकडा मिळू शकला नाही. दरम्यान, महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनीही रुग्णालयात जाऊन पाहणी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विचारपूस श्वानदंशाचे वृत्त कळताच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. डॉक्टरांनी त्यांना कुत्रा चावलेल्या रुग्णांना पाच इंजेक्शनचा कोर्स करावा लागणार असल्याची माहिती देऊन नेरे येथील रुग्णांना तेथेच इंजेक्शन घेता येईल, असे सांगितले. आमदार ठाकूर यांनी डॉक्टरांकडे औषधांचा पुरेसा साठा आहे का याची माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या.