नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मराठमोळी पूनम राऊतचे अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसर्या वन डे सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 6 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारतीय महिलांनी 53 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1ने बरोबरीही साधली आहे.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र दुसर्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. प्रिया पुनिया आणि जेमायमा रॉड्रीग्ज या झटपट माघारी परतल्या. यानंतर मराठमोळी पूनम राऊत आणि मिताली राज यांनी महत्त्वाची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. पूनम राऊतने यादरम्यान अर्धशतकी खेळी करत विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. याशिवाय मिताली राजने 40, तर हरमनप्रीत कौरने 46 धावांची खेळी करत भारताला 191 धावांचा टप्पा गाठून दिला. विंडीजकडून आलिया
अॅलेन, अॅफी फ्लेचर यांनी प्रत्येकी 2, तर आयेशा मोहम्मद आणि शबिका गजनाबी यांनी 1-1 बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार सारा टेलर आणि शेमिन कँपबेल यांनी काही काळ भारतीय गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही अपयश आलं. यानंतर विंडीजच्या सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्यांना झुलन गोस्वामी, शिखा पांडे यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.