मोहोपाडा : प्रतिनिधी
या वर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली शेती शेतकर्यांना सुखद करणारी होती, मात्र परतीच्या अवेळी पावसाने बहरलेल्या भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे डोळे पाणावले आहेत.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून गरीब शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळवणे भाजप विभागप्रमुख किरण माळी, तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. दिवाळीत विश्रांती घेत अवकाळी पावसाने पुन्हा रायगडकरांना चांगलेच झोडपून काढले आहे.कापलेल्या पिकाला कोंब आल्याने हाताशी आलेली पिके गमवावी लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसाने शेतकर्यांची भातशेती व पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने कासप, सवणे, जांभिवली, चावणे, कांबे, चांभार्ली, आंबिवली, तुराडे, गुळसुंदे व आसपासच्या परिसरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कराडे खुर्द तलाठी सजाचे श्री. वाघिलकर, कोतवाल रवी घरत यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कासप मरीआई मंदिराच्या सभामंडपात शेतकर्यांचे पंचनामे सुरू केले आहेत. कृषी विभागाकडून भातशेतीचे पंचनामे सुरू झाले असले, तरी शेतकर्यांनी शेतीत केलेला खर्च सुटेल की नाही हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच भात पिकाला कोंब आल्याने पुढल्या वर्षी भातशेती कशी करायची हा प्रश्नही बळीराजाला सतावत आहे. रसायनी व आसपासच्या परिसरातील शेतकर्यांच्या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व ते पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी यासाठी केळवणे भाजप विभागप्रमुख तथा चावणे विभागातील शेतकरी संघटनेचे किरण माळी यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.