डुनेडीन (न्यूझीलंड) : वृत्तसंस्था
न्यूझीलंडच्या रॉस टेलरने बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या वन डे सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यात टेलरच्या 69 धावांचा समावेश होता. त्याने या खेळीसह न्यझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. या सामन्यात टेलरने वन डे क्रिकेटमधील आठ धावांचा पल्लाही ओलांडला. दरम्यान, न्यूझीलंडने हा सामना जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.
टेलरने 82 चेंडूंत 7 चौकार खेचून 69 धावांची खेळी केली. त्याने आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप स्पर्धेत 8021 धावा केल्या आहेत. या कामगिरीसह तो न्यूझीलंडकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टेलरने माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा (8007) विक्रम मोडला. याशिवाय जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 8000 धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने 203 डावांमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला.
या विक्रमात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने 175 डावांमध्ये आठ हजार धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स (182 डाव) आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (200 डाव) यांचा क्रमांक येतो.
टेलरला फ्लेमिंगच्या एका विक्रमाने मात्र हुलकावणी दिली. फ्लेमिंगने जागतिक एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना 30 धावा केल्या होत्या आणि त्यामुळे सर्वाधिक धावा करणार्या किवी फलंदाजांत टेलर अजूनही दुसर्या क्रमांकावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला 11 धावांची गरज आहे.
लोकांनी केलेल्या अभिनंदनाने भारावून गेलो. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजाचा विक्रम नावावर केल्याचा अभिमान वाटतो.
-रॉस टेलर