दैनिक रामप्रहरच्या पाठपुराव्याला यश
कर्जत : बातमीदार – मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईनवरील शेलू स्थानकात आपत्कालीन सेवेतील कामगारांसाठी चालविली जाणारी उपनगरीय लोकल थांबत नव्हती. त्याबाबतचे वृत्त दैनिक रामप्रहरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने 16 ऑक्टोबरपासून शेलू स्थानकात लोकलला थांबा देण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे शेलू स्थानकात आता आपत्कालीन सेवेतील कामगारांसाठी 27 उपनगरीय गाड्या थांबू लागल्या आहेत.
कोरोना काळात बंद असलेली उपनगरीय लोकल सेवा जून महिन्यात सुरू झाल्यानंतर कर्जतसाठी लोकल सेवा सुरू झाली होती. आपत्कालीन सेवेतील कामगार यांच्यासाठी सुरू झालेल्या लोकलला कर्जत, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण असे थांबे देण्यात आले. मात्र शेलू स्थानकात लोकलला थांबा देण्यात आला नव्हता. 10 ऑक्टोबरपासून लोकलच्या फेर्यात वाढ झाल्यानंतरही फक्त शेलू स्थानकात लोकल थांबत नव्हती.
त्यामुळे त्या परिसरातील आपत्कालीन सेवेतील कामगारांना नेरळ किंवा वांगणी येथे अन्य वाहनाने येऊन लोकल पकडावी लागत होती. या सर्व कामगारांच्या वतीने शेलू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन तरे यांनी शेलू रेल्वे स्थानकात उपनगरीय लोकलला थांबा देण्याची मागणी केली होती. दैनिक रामप्रहरने याबाबत 11 ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापकांचा आदेश 15ऑक्टोबरला प्राप्त झाल्यानंतर मुंबई-कर्जत मार्गावरील सर्व 27 लोकल फेर्यांना शेलू स्थानकात थांबा देण्यात आला आहे. त्यानुसार पहाटे 1 वाजून 58 मिनिटांपासून ते रात्री 10.59 मिनिटेपर्यंत शेलू रेल्वे स्थानकातून लोकल सेवा उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा या स्थानकातून प्रवास करणार्या आपत्कालीन सेवेतील कामगारांना होणार आहे.