Breaking News

बॉलिवुडचे शुद्धीकरण

आजची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा अनेक फिल्मी तारकांना तसेच फॅशन डिझाइनर सिमॉन खंबांटा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले असून त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवुडमधील दिग्गजांच्या कपाटात दडलेले किती सापळे बाहेर येतील ते आताच सांगता येणार नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अकाली मृत्यूचे प्रकरण इतकी अनाकलनीय वळणे घेत-घेत अशा टप्प्यावर येऊन पोहचले आहे की हे वास्तव आहे की एखादा ‘बी ग्रेड’चा चित्रपट, असा प्रश्न पडावा. सुशांत सिंहच्या मृत्यूचे गूढ अजुनही तपासयंत्रणांना उकललेले नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे कुणाला त्यामध्ये फारसा रस देखील उरलेला नाही हे देखील तितकेच खरे. सुशांतच्या गूढ मृत्यूनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या तथाकथित विळख्याच्या कहाण्या समोर येत आहेत. त्या कहाण्यांमध्ये अनेक दिग्गज कलाकार, चित्रपटनिर्माते अडकण्याची शक्यता आहे. टीव्ही आणि समाजमाध्यमांमध्ये तर यापैकी काही कहाण्या चवीचवीने चघळल्याही जात आहेत. शुक्रवारी शेतकरी बिलाच्या विरोधात विरोधकांनी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असताना सारा देश टीव्हीसमोर खिळलेला असेल आणि तिथे बातम्या चालू असतील त्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कचेरीमध्ये चौकशीसाठी आलेल्या चित्रपट तारकांच्या. बॉलिवुडला अमली पदार्थांचा शाप लागला आहे व त्याचे त्वरित शुद्धीकरण व्हायला हवे, अशा आशयाची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार व भोजपुरी अभिनेते रवि किशन यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यावरून समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी संतापून ‘जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो’ असे जळजळीत उद्गार काढले होते. परंतुु गेल्या दोन दिवसांत एनसीबीच्या चौकशीतून ज्या प्रकारे बॉलिवुडमधील सेलेब्रिटींची नावे बाहेर येत आहेत ती पाहता खासदार रवि किशन यांचे म्हणणे सयुक्तिक असल्याचे लक्षात येईल. फिल्मी पार्ट्यांमधील मद्यपान, नाचगाणी, भानगडी-कुलंगडी हे काही आता भारतीय रसिकांसाठी नवीन राहिलेले नाही. अशा सवंग आणि उथळ वृत्तांकनाला टीव्ही माध्यमामध्ये चांगला टीआरपी देखील मिळतो. परंतु सर्वगुणसंपन्न अशा या बॉलिवुडला अमली पदार्थांच्या व्यसनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण झाली असेल असे मात्र कुणालाच वाटले नसेल. अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या आरोपांची परिणती बॉलिवुडच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये झाली आहे काय अशी शंका येते. तसे असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. कारण बॉलिवुडमधील तारेसितारे हे जनसामान्यांचे नायक-नायिका असतात. पडद्यावरील या तार्‍यांचे अनुकरण देशभरातील बाळगोपाळ आणि तरुणतरुणी करत असतात. म्हणून चित्रपट तारे आणि तारकांनी आपली प्रतिमा विशेषत्वाने जपायला हवी. अमली पदार्थांचा विळखा हा सार्‍या जगालाच भेडसावणारा प्रश्न आहे. आपला भारत देश देखील त्यास अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग आणि बेटिंगचे घोटाळे बाहेर येऊन भारतीय क्रिकेटचे एकप्रकारे शुद्धीकरण झाले होते. तशाच प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया बॉलिवुडमध्ये सुरू होते का हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल. जे मंथन समाजात आता घडते आहे, ते पारदर्शकपणे स्वीकारणे एवढेच आपल्या हाती आहे. शुद्धीकरणातून तावून सुलाखून निघालेली स्वच्छ सुंदर चंदेरी दुनिया सर्वांनाच हवीहवीशी वाटेल यात शंका नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply