नागोठणे परिसरातील शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार
पेण : प्रतिनिधी : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आश्वासनानंतर विष्णूभाई पाटील आणि 200 शेतकर्यांनी रिलायन्स कंपनीच्या विरोधातील आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले आहे. मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. विष्णूभाई आंदोलन मागे घ्या, शेतकर्यांना न्याय देण्यात येईल. त्यांना जमिनीची नुकसानभरपाई मिळेल. हा माझा शब्द आहे, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले व विष्णूभाई पाटील यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणे गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधीत शेतकर्यांना जमिनीची नुकसानभरपाई मिळण्याबाबत भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विष्णूभाई पाटील, शेतकरी विजय परशुराम पाटील, चंद्रकांत सिताराम घासे व इतर पेण, खालापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन उभारले होते. शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी विष्णूभाईसोबत सुमारे 200 शेतकरी उपोषणाला बसले होते.
रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकर्यांना त्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्यानंतर जमिनीच्या भावाबाबत योग्य तो मोबदला कंपनी प्रशासनाने दिला नाही. शेतकर्यांना जमिनीचा मोबदला देताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दर दिलेला आहे. त्यामध्ये शेतकर्यांची फसवणूक झालेली होती. गरीब व श्रीमंत शेतकरी असा भेदभाव करून गरीब शेतकर्यांना प्रति गुंठा 80 हजार तर श्रीमंत शेतकर्यांना 2 लाख 80 हजार ते 7 लाख असा प्रति गुंठा मोबदला देण्यात आला. हा शेतकर्यांवर झालेला अन्याय लक्षात घेऊन कंपनी प्रशासनाविरोधात शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत भाई विष्णू पाटील यांनी हा लढा उभारला. याअगोदर पेणमध्ये सामूहिक उपोषण तसेच पालकमंत्री रायगड यांच्या समवेत मंत्रालयात बैठक, प्रांत अधिकारी यांच्यासोबत बैठका होऊनसुद्धा योग्य तो न्याय मिळाला नव्हता. त्यामुळे करो या मरो अशी आरपारची लढाई विष्णूभाई पाटील यांनी उभारली. स्वत: विष्णूभाई तसेच पेण व खालापूर येथील प्रकल्पबाधित शेतकरी उपोषणास बसले होते.
मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विष्णूभाई व शेतकर्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. विष्णूभाई, शेतकर्यांचे 5 प्रतिनिधी व चंद्रकांतदादा यांच्यात यशस्वी चर्चा झाली.
शेतकर्यांना न्याय देण्याचा शब्द स्वत: चंद्रकांतदादांनी विष्णूभाईंना दिला. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनानुसार येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 27 जून रोजी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी, पेण व खालापूर प्रांताधिकारी, सक्षम अधिकारी पांडुरंग मगदूम, रिलायन्सचे अधिकारी, विष्णूभाई तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक होऊन तोडगा काढला जाणार आहे. चंद्रकांतदादांनी शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचा शब्द विष्णूभाईंना दिला आहे. 27 जूनच्या बैठकीनंतर शेतकर्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रकांतदादांच्या या आवाहनानंतर विष्णूभाई पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसहित महसूलमंत्र्यांचे आभार मानले. विष्णूभाईच्या आंदोलनामुळे न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.