डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांचे आवाहन
पाली : प्रतिनिधी
आगामी ईद सण सर्वांनी एकरूप होत शांततेत व सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासत गुण्यागोविंदाने साजरा करावा, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 6) पालीमध्ये केले. ईद व अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पालीत बुधवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यात सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असून, त्याचे आपण सर्वांनी स्वागत करूया, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या अफवा, धार्मिक भावना, राष्ट्रद्वेष भडकविणारे संदेश पसरू नयेत याकरिता सर्वांनी दक्षता घ्यावी. क्षुल्लक कारणावरून होणारे वाद जागीच मिटविण्यासाठी प्रयत्न करा. सर्वांनी कायदा- सुव्यवस्थेचे पालन करावे, अशा सूचना सूर्यवंशी यांनी या वेळी केल्या. आरिफ मणियार यांनी ईदीनिमित्त पालीत होणार्या कार्यक्रमाची माहिती दिली. पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, भाजप जिल्हा चिटणीस राजेश मपारा यांची या वेळी समयोचित भाषणे झाली. पाली सरपंच गणेश बालके, भाजप पाली शहरअध्यक्ष वा. सु. मराठे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक ओसवाल, ग. रा. म्हात्रे, प्रकाश कारखानीस, अनुपम कुलकर्णी, गोविंद शिंदे, संजय घोसाळकर, सुलतान बेनसेकर, डॉ. अपूर्व मुजुमदार, जितेंद्र केळकर, भगवान शिंदे, किरण खंडागळे, श्रद्धा देशमुख, मनीषा पाशीलकर, अरुणा उतेकर आदींसह पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पत्रकार बैठकीला उपस्थित होते.