उरण : वार्ताहर
सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अभियान बुधवारी (दि. 20) सकाळी 6 वाजता ते गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 6 वाजेपर्यंत होते.
मोरा जेट्टीवर मुंबईहून बोटी मार्गे येणारे प्रवासी व उरण येथून मुंबईला जाणारे प्रवासी यांच्या सामान, सामग्रीची व इतर तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे हनुमान कोळीवाडा जेट्टी, केगाव लँडिंग पॉईंट, मरीन सोल्युशन, नवनीत मरीन घारापुरी येथील शेत बंदर, जेट्टी, राज बंदर जेट्टी आदी ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 8 अधिकारी 45 पोलीस कर्मचारी असे होते.
26/11 नंतर पोलीस आणि राज्य सरकार सागरी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूक झाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ला लक्षात घेऊन पोलिसांनी अशा व्यापक सागरी हद्दीचे रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. सागरी हद्दीत अनोळखी बोट दिसली तरी किनार्यावर राहणार्यांमध्ये घबराट पसरते. अशा परिस्थितीत मच्छीमारांनीही सागरी सुरक्षेसाठी सज्ज असावे ही गरज लक्षात घेऊन सागरी कवच अभियानाचे आयोजन करण्यात येते.