पनवेल : बातमीदार
रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने अनेक गैरसोयी आहेत. पनवेल रेल्वेस्थानकात प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरील जिना रुंदीकरण करण्याची गरज आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. पनवेल रेल्वे स्थानकाची मंगळवारी (दि. 5) ठाकूर यांनी पाहणी केली.
सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सोयीसुविधा जाणून घेण्यासाठी मंगळवारी पनवेल रेल्वेस्थानकाला भेट दिली. पनवेल शहर व तालुक्यात येत्या काळात होणारे प्रकल्प पाहता प्रवासाच्या दृष्टीने पनवेल रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. या स्थानकातून प्रवाशांना योग्य सुविधा मिळाली पाहिजेत. दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकावरील सोयीसुविधांसाठी पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असतो. मंगळवारी केलेल्या पाहणीत ठाकूर यांनी प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेता बाहेरील बाजूस असलेली रिक्षाव्यवस्था वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून सुरळीत करावी, प्रथमोपचारासाठी असलेले क्लिनिक रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे, हे क्लिनिक आतल्या बाजूस घेऊन क्लिनिकची संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परगावी जाणार्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर असलेल्या अरुंद व विरुद्ध दिशेला असलेल्या जिन्यामुळे प्रवाशांना गर्दीत जिना चढताना, उतरताना त्रास सहन करावा लागतो. त्या जिन्याची दिशा योग्य करून जिन्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी रेल्वेस्थानक व्यवस्थापनाकडे केली. या वेळी प्रशांत ठाकूर यांनी प्रवाशांशी संवाद साधून प्रवाशांची मते जाणून घेतली. प्रवाशांच्या प्रश्नांबाबत अधिकार्यांशीदेखील चर्चा केली. या वेळी नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, नगरसेविका सुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, सचिव श्रीकांत बापट आदी उपस्थित होते.