पेण ः प्रतिनिधी
पर्यावरणाचे कारण पुढे करून हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याचे काम काही शहरी नक्षलवादी करीत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकार वेळोवेळी करेल, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 20) येथे दिले.
पीओपी गणेशमूर्ती बनविणे व विक्री करणे यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच उठवल्याने मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये मोलाची भूमिका निभावणारे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन हमरापूर विभाग गणेश मूर्तीकार उत्कर्ष मंडळाच्या वतीने पेण तालुक्यातील तांबडशेत येथे करण्यात आले होतेे. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जि.प. अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी सभापती सदस्य चित्रा पाटील, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तीकार संघटनचे अध्यक्ष अभय म्हात्रे, हमरापूर संघटना अध्यक्ष जयेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गणेशमूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीओपी बंदीद्वारे गणेश मूर्तिकारांवर गदा आणण्याचे काम हे आघाडी सरकारचे पाप आहे. पीओपीच्या मूर्तींवरील बंदीबाबत ठरवून षडयंत्र केले गेले, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मूर्तीकार बांधवांच्या सोबतीने एकजुटीने लढलो आणि जिंकलो. हा विजय आपल्या पारंपरिक सणांच्या जपणुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे, असे सांगून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव करण्याचे काम महायुती सरकारने केल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले.
या वेळी बोलताना खासदार धैर्यशील पाटील यांनी, या भागात मोठ्या प्रमाणात तरुणांना गणपती कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण झालेला आहे. पर्यावरणवाद्यांना फक्त पीओपीचे प्रदूषण दिसते का? येथील कारखान्यांचे प्रदूषण दिसत नाही का? असा सवाल केला.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, श्रद्धाळू, भाविकांच्या भावना जपण्याचे काम केंद्रात पंतप्रधान नरेंद मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करीत आहे. देशभरातील तीर्थस्थळी जाण्यासाठी असणार्या रस्त्यांचा कायापालट करण्याचे काम झाले असून या माध्यमातून ठिकठिकाणी भाविकांना जाणे सुकर झाले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपली अस्मिता जपण्याचे काम होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम होत आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता 600 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले. देशात पाच ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके उभारण्याचे काम होत आहे. अशा प्रकारे आपली श्रद्धास्थाने, तीर्थस्थाने जपण्याचे काम सरकार करीत आहे.
आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की, या भागात पूर्वी शेती, शेतीपूरक व्यवसाय व दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने होत असताना येथील नागरिकांनी गणेशमूर्ती व्यवसाय अवलंबला. यातून चांगली रोजगार निर्मिती होत गेली. आता गणेशमूर्ती बनविणे व विक्री करणे हा येथील प्रमुख व्यवसाय बनला असून यातून हजारो तरुणांना रोजगार निर्माण करण्याचे काम झाले आहे. मध्यंतरीच्या काळात पीओपीच्या बंदीमुळे येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी न्यायालयीन लढा जिंकून गणपती कारखानदारांवरचे संकट दूर करण्यात यश मिळविले आहे.
गणेश मूर्तिकारांना दिलासा मिळवून देण्यात मोलाचे वाटा उचलणारे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार हे खर्या अर्थाने संस्कृती व धर्मरक्षक ठरले असल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मूर्तिकार कुणाल पाटील यांनी मानले.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper