माजी सरपंच विलास पाटील यांची मागणी
चिरनेर : रामप्रहर वृत्त
गव्हाण फाटा-दिघोडे या रहदारीच्या रस्त्यावर अवजड कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक बेदरकारपणे होत असल्याने मोठ्या अपघातांची शक्यता बळावली आहे. पर्यायाने या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वीप्रमाणेच गतिरोधक बनवावे, अशी मागणी भाजपचे युवा नेते व वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली आहे.
गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर मोठ्या प्रमाणात कंटेनर्स गोदामे निर्माण झाली आहेत. त्या ठिकाणी अवजड कंटेनर टेलर्सची सतत मोठी वर्दळ सुरू असते. नव्याने निर्माण झालेल्या या मार्गाचे नुतनीकरण करताना कंत्राटदाराने एकही गतिरोघक न ठेवल्याने कंटेनर ट्रेलर्स चालक वाहनांची बेदरकारपणे वाहतूक करत असतात त्यामुळे या मार्गावर असणार्या जांभूळ पाडा, वेश्वी, दिघोडे या गावांतील नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे वेश्वी प्राथमिक शाळा याच रस्त्यालगत असून तेथेही गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिणामतः या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर गतिरोधक बसवून जनतेच्या जीवाची सुरक्षा करावी, अशी आग्रही मागणी भाजप युवा नेते, बेश्वी गावचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली आहे.