Breaking News

‘हिटमॅन’ बरसला, भारत जिंकला!

दुसर्‍या टी-20 सामन्यात बांगलादेशवर मात

राजकोट : वृत्तसंस्था

पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात दमदार पुनरागमन केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. कर्णधार रोहितने 85 धावांची खेळी करीत विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (29), मोहम्मद नईम (36), सौम्या सरकार (30) आणि मोहम्मदुल्लाह (30) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक बळावर बांगलादेशने 20 षटकांत 6 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे 154 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक दोन बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. 118 धावांच्या भागीदारीनंतर धवन बाद झाला. धवनने 27 चेंडूत चार चौकार लगावत 31 धावा केल्या. दुसरीकडे रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो 85 धावांवर माघारी परतला. त्याने प्रत्येकी सहा चौकार आणि षटकार लगावत केवळ 43 चेंडूंत 85 धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करीत 13 चेंडूंत नाबाद 24 धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. रोहितला त्याच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 10 तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply