11 जणांना अटक; 10 लाखांचे दागिने, घातक शस्त्रांसह 89 एटीएम कार्ड हस्तगत
पनवेल ः वार्ताहर
ज्येठ नागरिकांना एकटे गाठून बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम फसवणूक करणार्या तीन गुन्हेगारांना व एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेऊन हातचलाखीने एटीएमची अदला-बदल करून फसवणूक करणार्या बिहार राज्यातील 8 जणांच्या टोळीस गुन्हे शाखा कक्ष पनवेल यांनी गजाआड केले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील 10 लाखांचे दागिने, घातक शस्त्रे व 89 एटीएम कार्ड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मागील दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना बतावणी करून त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याबाबतचे काही गुन्हे नवी मुंबई आयुक्तालयात दाखल झाले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळ, सीसीटिव्ही कॅमेरे व गोपनिय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून युसुफ सैय्यद वय 24, रा. गुलशन चाळ, टिटवाळा पूर्व-कल्याण, गणेश शिंदे वय 40 (रिक्षाचालक) रा. साईकृष्णा चाळ, मोहिली गाव-कल्याण, सुरज रेवणकर वय 30 ज्वेलर्स, रा. विमलेश्वर निवास, उल्हासनगर या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी अंदाजे 10 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून एकूण 25 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यासोबतच एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करीत असताना, अशा प्रकारचे गुन्हे करणारी बिहार राज्यातील एक टोळी सक्रीय असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ही टोळी बिहार राज्यातून काही कालावधीसाठी मुंबईत येऊन गुन्हे करुन परत बिहार येथे निघून जात असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर नजर ठेवली असता, ही टोळी पनवेल शहरील काही एटीएम सेंटरवर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 8 जणांच्या टोळीला कर्नाळा स्पोर्ट्स लगतच्या परिसरात दरोड्याची तयारी करीत असताना घातक शस्त्रांसह रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडे घातक शस्त्रांसह एकूण 89 एटीएम कार्डस सापडले आहेत. यामध्ये बच्चा महावीर महातो वय 43, रा. मठीया बरीयापुर, मथुरापूर-बिहार, मुनीलालकुमार कृष्णा महातो वय 25, नवीन इंदर सवान वय 24, नरेशकुमार रामबाबु सहाणी वय 31, सुनिल बोंधा स्वामी वय 26, भदाई हिरामण सहाणी वय 28, आवधेश लालजी पासवान वय 28, मोहम्मद रिझवान मोहम्मद नन्ने वय 32 (सर्व रा. ज्यु चंद्र झोपडपट्टी, नायगाव, ठाणे, मूळ रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून फसवणुकीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. अजूनही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.