श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी अनेक क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या 18 वर्षांपासून राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाची ही 19वी स्पर्धा आहे.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 75 हजार रुपये, व्दितीय 35 हजार व तृतीय क्रमांकास 20 हजार रुपये, तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रुपये, उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी 2500 रुपये, उत्कृष्ट विशेषांकास पाच हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये व सन्मानचिन्ह, तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास 30 हजार रुपये, व्दितीय 15 हजार रुपये आणि तृतीय क्रमाकांस सात हजार 500 रुपये, तर दोन उत्तेजनार्थ व सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे व संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती 100 रुपये प्रवेश फीसह 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक 475, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड, मोबाईल क्रमांक 9769409161 येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.