Breaking News

बा विठ्ठला! राज्यातील शेतकरी सुखी व्हावा!!

चंद्रकांत पाटील यांचे साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातीला दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे, अशी माहिती महसूल मंत्री पाटील यांनी दिली.

गेली तीन चार वर्षे निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

ओमासे दाम्पत्याला मान

मानाचे वारकरी ठरलेले सुनील ओमासे व नंदा ओमासे हे दाम्पत्य सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी असलेले ओमासे 2003पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा चांदीची विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply