नातेवाइकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
कर्जत : बातमीदार – बाळंतपणासाठी दाखल केलेल्या कर्जत तालुक्यातील कुंडलज येथील गर्भवती महिलेचा बाळंतपणादरम्यान बालकासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी आरोग्य यंत्रणेवर संशय व्यक्त केला असून, डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
कुंडलज येथील गर्भवती महिला प्रिता जसपाल सिंग ऊर्फ सपना प्रकाश ठोंबरे यांच्या पोटात 30 एप्रिल रोजी कळा येत असल्याने त्यांना त्यांच्या माहेरच्या मंडळींनी बाळंतपणासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉ. रामकृष्ण पाटील यांनी अजून थोडा वेळ असून, रुग्णाला तुम्ही घरी न्या असे सांगितले. तीन दिवसांनी म्हणजे 3 मे रोजी गरोदर महिलेला पुन्हा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेव्हा डॉ. पाटील यांनी तपासणी करून बाळंतपण नैसर्गिक होईल असे सांगून गरोदर महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. दुपारी 2 वाजता महिलेने मृत बालकास जन्म दिला असल्याचे डॉ. पाटील यांनी बाहेर येऊन महिलेच्या नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर अर्धा तासाने महिला शुद्धीवर आली असता, तिने नातेवाइकांशी बोलणे केले, मात्र दोन तास झाले तरी तिचा रक्तस्राव थांबत नव्हता, उलट वाढत होता.
महिलेची प्रकृती अधिक खालावल्याचे पाहून तिला डॉ. पाटील यांनी पनवेल येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला तसेच नातेवाइकांकडून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. पनवेलला पोहचल्यावर महिलेला डॉ. पाटील यांनी मित्राच्या दवाखान्यात नेले आणि तिथे बाळंतपणानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर डॉ. पाटील यांनी मृत महिलेचे शवविच्छेदन करून रिपोर्ट तयार केला आणि मध्यरात्री 2 वाजता मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला. त्यामुळे महिलेच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलेचे पती जयपाल सिंग यांनी आपल्या पत्नीचा आणि जन्मजात बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप केला आहे.
आपण नैसर्गिकरित्या मृत महिलेचे बाळंतपण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने आपण तिला पनवेलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः सोबत गेलो.
-डॉ. रामकृष्ण पाटील, कर्जत उपजिल्हा रुग्णालय