रोहा, पाली : प्रतिनिधी
नागोठणे येथील रिलायन्स कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने बुधवारी (दि. 13) रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहे शहरातील अष्टमी नदी पूल ते प्रांताधिकारी कार्यालय मार्गे निघालेल्या या मोर्चात संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, बळीराम बडे, गंगाराम मिनमीने, प्रमोद चोरघे, चेतन जाधव, अनंता फसाळे, प्रबोधिनी कुथे, गुलाब शेलार, प्रेमा पेडेकर, दत्ता तरे, सोमनाथ पारंगे, हरेश नाकते आदींसह प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या एका शिष्टमंडळाने प्रांताधिकारी श्री माने यांची भेट घेतली. यावेळी रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, अजिंक्य पाटील आणि आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी यांच्यात आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात तब्बल अडीच तास चर्चा झाली. यावेळी तहसीलदार कविता जाधव उपस्थित होत्या. या बैठकीत भूमिहीन प्रमाणपत्र धारकांची अंतिम यादी जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द केली असल्याची माहिती प्रांताधिकार्यांनी दिली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस निरीक्षक सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.