मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलमधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स संघाने एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला नव्या मोसमासाठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता.
बोल्टने 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 33 सामन्यांत त्याने 38 बळी टिपले. 2018 साली त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने जवळपास दोन कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. दिल्लीकडून दोन हंगामांत खेळल्यानंतर बोल्ट आता बोल्ट 2020मध्ये मुंबईकडून खेळणार आहे.
चार वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सने यापूर्वी विंडीजच्या शेरफेन रदरफोर्ड याला संघात समाविष्ट करून घेतले होते. बोल्टने 2018मध्ये दिल्लीसाठी 18 सामन्यांत 18 बळी टिपले. त्यानंतर आयपीएल 2019मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. त्या पूर्ण हंगामात त्याने पाच सामन्यात पाच बळी टिपले.
अन्य संघांतही बदल
फिरकीपटू जगदीशा सुचित याला किंग्ज इलेव्हन पंजाबशी दिल्ली संघात ट्रेड करण्यात आले आहे. दिल्लीने रविचंद्रन अश्विन याच्यासह सूचितचा करार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या पुढील आवृत्तीत भारताचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूत राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. राजस्थानकडून खेळणार्या कृष्णाप्पा गौतमला किंग्ज इलेव्हन पंजाबचे, तर धवल कुलकर्णी याला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळाले आहे.