Breaking News

सात घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद

30 तोळे सोन्यासह चोरीची साधनेही जप्त

कर्जत : बातमीदार

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017पासून घरफोड्या करणार्‍या एकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांतील घरफोड्यांचे एकूण सात गुन्हे उघड झाले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले तब्बल 30 तोळे सोनेदेखील नेरळ पोलिसांनी जप्त केले आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017पासून छोट्या मोठ्या चोर्‍या व घरफोड्यांचे सत्र सुरू होते. 3 नोव्हेंबरच्या रात्री बेकरे गावातील दीनानाथ मालू कराळे यांच्या घरात चोरी झाली होती. त्यात 850 रुपये रोख व टेबलवर ठेवलेला मोबाइल चोरट्याच्या हाती लागला. मोबाइलचे पॅटर्न लॉक काही केल्या उघडत नाही हे समजल्यावर चोरट्याने तो मोबाइल तिथेच ठेवत रोख रक्कम घेऊन पळ काढला, मात्र मोबाइलचा लॉक उघडण्याच्या नादात चोरट्याने नकळत चुकीचा पासवर्ड एंटर केल्याने त्याचा सेल्फी त्या मोबाइलमध्ये सेव्ह झाला. ते लक्षात आल्यावर कराळे यांनी तडक नेरळ पोलीस ठाणे गाठत आपली फिर्याद नोंदवली. चोराचा फोटोच हाती लागल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाची चक्रे वेगात फिरवली. त्यांनी उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, गिरीश भालचिम, सहाय्यक फौजदार गणेश गिरी, हवालदार सुखदेवे, पोलीस नाईक निलेश वाणी, शरद फरांदे, समीर भोईर, पोलीस शिपाई वैभव बारगजे यांचे पथक तयार केले. या पथकाने नेरळ कोल्हारे चारफाटा येथे पाळत ठेवून 10 नोव्हेंबर रोजी गौतम विलास माने याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने नेरळ परिसरातील जिते, नेरळ-पाडा, भडवळ, उकरूळ, आंबिवली, पोशीर या गावांत घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या सर्व ठिकाणांहून त्याने तब्बल 30 तोळे सोने चोरून त्याच्या लगडी बनवून ठेवल्या होत्या. रोख 3200 रुपयेही होते. ते सर्व पोलिसांनी जप्त केले आहे. घरफोड्या करण्यासाठीची वापरलेली हत्यारेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात हात आहे का, याचा नेरळ पोलीस तपास करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply