नागपूर : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडेमध्ये भारताचा 8 धावांनी रोमांचक विजय झाला. यामुळे भारतानं 5 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडेमधला भारताचा हा 500वा विजय होता. वनडेमध्ये 500 विजय मिळवणारा भारत हा दुसरा देश बनला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 924 मॅचमध्ये 558 विजय मिळवले आहेत, तर 323 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. या यादीमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. भारतानं 963 मॅचमध्ये 500 विजय मिळवले, तर 414 मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
विराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडेमध्ये 116 रनची शतकी खेळी केली. त्याच्या वनडे कारकिर्दीतीलं हे 40वं शतकं ठरलं. या शतकी खेळीसोबत योगायोग घडला आहे. हा योगायोग कोहलीच्या 39 आणि 40 व्या शतकाबद्दल आहे.
यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्यातल्या दुसर्या वनडेमध्ये विराटनं 39वं शतक केलं. तर 40वं शतकही विराटनं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यातील दुसर्याच वनडेमध्ये केलं. योगायोग म्हणजे विराटच्या 39व्या आणि 40व्या शतकावेळी मंगळवारच होता. विराटनं जेव्हा 39वं शतक केलं होतं तेव्हा भारताचा सहा विकेटनी विजय झाला होता.
ते रेकॉर्ड कायम राहिलं
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडे मॅचमध्ये शानदार शतक लगावले. त्याने 116 रन केल्या. विराटच्या या खेळीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 रनचे आव्हान दिले. या शतकी कामगिरीसोबत विराट कोहलीने नागपूरच्या जामठा मैदानावरील भारतीय टीमचा एक विक्रम कायम ठेवला आहे. भारतीय टीम जेव्हा या मैदानावर खेळली आहे, तेव्हा भारताकडून किमान एकातरी खेळाडूने शतक लगावले आहे. भारत आतापर्यंत नागपूरच्या या मैदानावर एकूण पाच मॅच खेळली आहे, तर आजची सहावी मॅच आहे. या सहा मॅचपैकी तीन मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाल्या आहेत. तर भारत उर्वरित दोन मॅच श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत खेळला आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. भारतीय टीमने याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे.