खालापुरात विकासकामे मंदावली; अतिरिक्त चार्ज खोपोली मुख्याधिकार्यांकडे
खोपोली : प्रतिनिधी
चार वर्षांत कौस्तुभ गव्हाणकर यांच्या रूपाने फक्त 18 महिनेच खालापूर नगर पंचायतीला पूर्ण वेळ मुख्याधिकारी प्राप्त झाला आहे. उर्वरित काळात या नगर पंचायतीचा कारभार अतिरिक्त चार्ज म्हणून खोपोलीच्या मुख्याधिकार्यांकडूनच चालविला जात आहे. त्यामुळे खालापूरला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, असा संतप्त सवाल येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून होत आहे.
सन 2015च्या शेवटच्या महिन्यात खालापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले. 2016च्या सुरुवातीला नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता नगर पंचायतीवर आली. तेव्हापासून नगर पंचायतीचा कारभार खर्या अर्थाने सुरू झाला. चार वर्षांत फक्त 18 महिनेच पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी लाभला. महामुंबई व स्मार्ट सिटी प्रकल्पात खालापूर केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारकडून अन्य विविध विकास प्रकल्पाच्या घोषणाही करण्यात आल्या, मात्र या विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन, कागदोपत्री अहवाल, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या बैठका व संवाद आदी बाबी पूर्ण होण्यासाठी मजबूत प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे नगर पंचायत स्थापन झाल्यापासून निम्म्याहून अधिक कालखंडात अतिरिक्त चार्ज म्हणून खोपोलीच्या मुख्याधिकार्यांकडे येथील कारभार असल्याने विकास प्रकल्प पूर्ण होण्यात अडचणी येत असल्याची तक्रार येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांची आहे.
खालापूर तालुक्याचे शहर आहे. येथील नागरी व प्रशासकीय समस्या वेगळ्या आहेत. राज्य सरकारकडून विविध विकास प्रकल्प खालापूर नगर पंचायत क्षेत्रात प्रस्तावित आहेत. त्यांची योग्य कार्यवाही होण्यासाठी पूर्ण वेळ सक्षम मुख्याधिकारी मिळणे अतिशय गरजेचे आहे.
-उमेश गावंड, नगरसेवक, खालापूर
दैनंदिन कामे वेळेवर होण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी सर्व प्रकारचे सहकार्य व वेळ देतात. कार्यालयीन अधीक्षक म्हणून मी पूर्ण क्षमतेने कामकाज बघत आहे. इतर अधिकारीही दैनंदिन कामकाज वेळेच्या बंधनात करीत आहेत. यात फारशा अडचणी निर्माण होत नाहीत.
-त्रंबक देशमुख, कार्यालयीन अधीक्षक, खालापूर नगर पंचायत
समस्या अनेक, कार्यवाही मात्र नाही
खालापूर नगरपंचायतमध्ये खालापूर, महड, दांडवाडी, वणवे निभोडे ही चार गावे व तीन वाड्यांचा समावेश आहे. अपूर्ण पाणीपुरवठा, खराब रस्ते, बिघडलेली आरोग्यसेवा व कमकुवत नागरी स्वच्छता येथील प्रमुख समस्या आहेत. नगर पंचायतीकडून आधुनिक दिवाबत्ती, बाजार संकुल, नवीन पाणीपुरवठा योजना, दोन समाज मंदिरे, दोन गाव तलावांची साफसफाई व सुशोभीकरण, व्यापारी संकुल आदी विकास प्रकल्प मंजूर आहेत, मात्र कागदोपत्री पूर्तता, निविदा प्रक्रिया आणि कार्य अहवाल आदी प्रशासकीय कामे पूर्ण होत नसल्याने सर्वच कामे फायलीत बंद आहेत.
दुय्यम अधिकारी व लोकप्रतिनिधींची धावाधाव
पूर्वीची दीड वर्ष तत्कालीन खोपोली मुख्याधिकारी दीपक सावंत, नयन ससाणे यांच्याकडे व वर्तमान काळात गणेश शेटे यांच्याकडे खालापूर नगरपंचायतीचा अतिरिक्त चार्ज आहे. ठराव मंजुरी, दैनंदिन कागदपत्रे मंजुरी, कार्यालयीन नोटिसा, निविदा प्रक्रिया आदींवर अंतिम स्वाक्षरी घेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, दुय्यम अधिकारी, अभियंता, कार्यालयीन अधीक्षक यांना दररोज खोपोली नगरपालिकेकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया व कामांना अक्षम्य दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे.