Breaking News

आरक्षणामुळे दिग्गजांचा अपेक्षाभंग, जि.प. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव

अलिबाग : प्रतिनिधी

पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप)  अध्यक्षपद  अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचा अपेक्षा भंग झाला आहे.  सध्याच्या सदस्यांमध्ये शेकापच्या दोन, शिवसेना व काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक अशा चार अनुसूचित जाती महिला सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूकीत कमी सदस्य निवडून आले असतानादेखील  शेकापने ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना अध्यक्षपद दिले.  आता आदिती तटकरे यांचा कार्यकाळ संपला आहे.  त्यामुळे आपल्याला अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी मंगळवारी (दि. 19) मुंबईत सोडत काढण्यात आली. या आरक्षणाकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. यात चक्रानुक्रमे अनुसूचित जमाती महिलेसाठी रायगड जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या रांगेत असलेल्या अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे.

शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीतील निर्णयानुसार पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीला अध्यक्ष पद तर पुढची अडीच वर्षे शेकापला असा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादीचा कार्यकाल संपला आता शेकापचा सुरू झाला आहे. यावेळी अ‍ॅड. निलीमा पाटील यांना हे अध्यक्षपद देण्याचे शेकाप नेतृत्वाने मान्य केले होते. तसेच अनुसूचित जामाती सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडल्यास आपल्याला अध्यपद मिळावे, यासाठीदेखील काहीजणांनी फिल्डींग लावली होती.  परंतु आता आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी पडल्यामुळे या सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

रायगड जिल्हा परिषदेत सध्या योगिता पारधी व पदीबाई  ठाकरे (शेकाप पनवेल), सहारा कोळंबे (शिवसेना ) व अनुसया पादीर (काँगेस) या चार अनुसूचित जाती माहिला सदस्या आहेत. द्रौपदी पवार या शिवसेनेच्या अनुसूचित जमातीच्या महिला सदस्य होत्या. परंतु त्यांचे निधन झाले.

रायगड जिल्हा परिषदेचे एकूण 59 सदस्य आहेत. त्यापैकी द्रौपदी पवार यांचे निधन झाले. तर विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्यामुळे अदिती तटकरे याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत 57 सदस्य मतदान करतील. त्यात शेकापचे 23, राष्ट्रवदीचे 11, शिवसेना 17, भाजप 3 व काँग्रेस 3असे बालाबल आहे. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलताना दिसताहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवीन आघाडीची समीकरणे जुळतील काय, याची चर्चा सध्या रायगडात सुरू आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply