Breaking News

माणगावची 108 रूग्णवाहिका ‘कोमात’, रूग्णसेवा ठप्प

माणगाव : प्रतिनिधी

शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माणगाव उपजिल्हा रूग्णालयाला 108 क्रमांकाची रूग्णवाहिका मिळाली आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभी आहे, त्यामुळे अनेक गरजू व तातडीच्या रूग्णांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

मुंबई -गोवा महामार्गावरील  माणगांव येथे उपजिल्हा रूग्णालय आहे. या रूग्णालयात दक्षिण रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली आदी भागांतून तातडीचे रूग्ण तसेच अपघातग्रस्त मोठया प्रमाणात या रूग्णालयात उपचारासाठी येतात. मुंबई – गोवा महामार्गावर सततचे वाढते अपघात यांच्यावर उपचार करण्यासाठी या परिसरात हे एकमेव उपजिल्हा रूग्णालय आहे. या उपजिल्हा रूग्णालयाला शासनाने फेबु्रवारी 2014 मध्ये 108 क्रमांकाची सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त अशी रूग्णवाहिका दिली आहे.  माणगावमधील या 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवर एका वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र हे पद रिक्त झाल्याने ही रूग्णवाहिका गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे.  या तातडीच्या रूग्णवाहिकेवर तात्काळ वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply