सुसाट वाहने चालवल्यास होणार दंड; अत्याधुनिक वाहनांद्वारे होणार कारवाई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यापुढे वेगमर्यादेपेक्षा सुसाट वाहने चालवल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर या दंडाबाबतचे थेट चलान वाहनचालकाला घरपोच मिळणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडे आलेल्या अत्याधुनिक वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे.
राज्यभरात द्रुतगती मार्गासह चार मार्गिका रस्ते आणि महापालिका हद्दीतील रस्त्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत अशा दोन अत्याधुनिक वाहनांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते नुकतेच या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या वाहनांवर वाहतूक अधिकारी आणि कर्मचारी असतील. ही वाहने शीव-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर महामार्ग तसेच पामबीच मार्गावर गस्त घालणार आहेत. वेगाने येणार्या वाहनांवर कारवाई करून ऑनलाइन नोटीस दिली जाणार आहे, तसेच प्रत्यक्ष जागेवरही कारवाई केली जाणार आहे. याच अत्याधुनिक वाहनांमध्ये स्पीड गन, ब्रेथ अॅनालायजर, टिंट मीटर या उपकरणांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक विभागाच्या कारवाईला इंटरसेप्टर या दोन नव्या अत्याधुनिक वाहनांची मदत होणार आहे. सध्या घडणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी इंटरसेप्टरच्या साहाय्याने वेगवान गाड्यांचा वेध घेण्याचे ठरवले आहे. नवी मुंबईत गेल्या वर्षी अपघातात 258 जणांना जीव गमवावा लागला होता. यात मुख्यत्वे वाहनांचा अतिवेग, मद्यपान करून वाहन चालवणे या प्रकारामुळे अधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे नव्या यंत्रणेद्वारे या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.