Breaking News

परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ

बीसीसीआय करणार चार्टर्ड फ्लाइटची सोय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएलचे 14वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे, पण काही देशांनी भारतातून येणार्‍या विमानसेवा रद्द केल्याने मायदेशात कसे जायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकले आहेत. देशातील कोरोना परिस्थिती पाहता त्यांना लवकरात लवकर मायदेशात पोहचायचे आहे आणि त्यासाठी बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांना घरी सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य अधिकारी निक हॉकली यांनी दिली आहे.  ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशात जाण्यापूर्वी मालदिवचा आसरा घेतील, अशी चर्चा होती, परंतु आता त्यांना श्रीलंकेचा पर्यायही समोर आला आहे. हॉकली यांनी हे दोन पर्याय समोर ठेवले आहेत. ते म्हणाले, सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अम्पायर्स, समालोचक यांना सुखरूप घरी आणण्यासाठी आम्ही सर्व तयारी करीत आहोत. बीसीसीआय आणि आम्ही सोबत मिळून काम करीत आहोत.
बीसीसीआयकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बीसीसीआयकडून आम्हाला पुढील डिटेल्स मिळतील. मालदिव किंवा श्रीलंका येथून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी बीसीसीआय चार्टर्ड फ्लाइट्सचीही सोय करणार आहे. बीसीसीआय त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी होणार असून त्यांना सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कागिसो रबाडा व अ‍ॅनरिच नॉर्ट्झे यांच्यात भीतीचे वातावरण आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर व लुंगी एनगीडी यांनाही कोरोनाची भीती आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply