पराकोटीच्या राजकीय भांडणात शब्दाने शब्द वाढतो आणि विनाकारण तणाव निर्माण होतात हे तर खरेच. आपण आपल्याच हाताने परतीच्या वाटा बंद करीत चाललो आहोत, नजीकच्या भविष्यात हा मार्ग परिस्थिती आणखी अवघड करेल याचे भान ठेवायला हवे. परिस्थिती शक्यतो चिघळू नये याची पुरेशी काळजी भारतीय जनता पक्षाने जरुर घेतली आहे हे तर दिसतेच आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात महाराष्ट्र्राचे राजकारण सध्या पुरते ढवळून निघाले आहे. ज्याच्यासाठी सरकार स्थापन करावयाचे असते, तो सर्वसामान्य मराठी माणूस तसेच ओल्या दुष्काळाने देशोधडीला लागलेला मराठी शेतकरी यांना वार्यावर सोडून खुर्चीची भांडणे सुरू आहेत. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाने वास्तववादी भूमिका स्वीकारून सत्तास्थापनेबाबत असमर्थता व्यक्त केली, त्याला पंधरवडा उलटून गेला. तीस वर्षांचे नाते तोडून मित्रपक्षाने विरोधकांच्या गोटात राजरोस शिरण्याचे उद्योग सुरू केल्याने संख्याबळ असूनही भाजपला काहीही करता आले नाही. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या लालसेपायी मित्राची साथ सोडून विरोधकांना सामील झालेल्या शिवसेनेने आता राजकारणाच्या नावाखाली सभ्यतेच्या मर्यादाही सोडल्या आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. भारतीय जनता पक्षावर खोटारडेपणाचा आरोप करून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मनधरणीला सुरूवात केली. ‘खुर्चीसाठी काय वाटेल ते’ हे जणू या पक्षाचे राजकीय धोरणच बनले आहे. सत्तेच्या राजकारणात एकमेकांना प्रखर विरोध करणे, त्यासाठी नवनवे डावपेच लढवणे हे सारे समजून घेता येते कारण आपण स्वीकारलेली बहुपक्षीय संसदीय लोकशाही व्यवस्था या गोष्टींना अस्वीकारार्ह मानत नाही. तथापि असे राजकारण खेळताना वैयक्तिक हेवेदावे, अर्वाच्च्य टीकाटिप्पण्या यांच्यापासून मात्र दूर राहता आले पाहिजे. दुर्दैवाने सध्या तसे घडताना दिसत नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दोन्ही मित्रपक्षांमध्ये मनोमिलन घडवण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत तयारी दर्शवली. ते काही वावगे नव्हते. किंबहुना, मराठी संस्कृतीचे सकारात्मक प्रतिबिंबच त्यात दिसले. परंतु, केंद्रात राज्यमंत्री असलेल्या आठवले यांनी कॅबिनेट मंत्री होण्यासाठीची धडपड सुरू ठेवावी. आमच्या भानगडीत पडू नये, अशी तुच्छतानिदर्शक टिप्पणी शिवसेनेकडून करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून स्वत:च काढता पाय घेतला. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण न आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेेने प्रचंड कांगावा केला. संसदेत सत्ताधारी बाकांवरून उचलबांगडी झाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर अर्वाच्च्य टीका करण्यात आली. आपले सत्तेचे राजकारण साधण्यासाठी शिवसेनेतर्फे वारंवार होणारे हे आणि असे अपमान नेमके काय साधतात हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे शिवसेना सोडली तर कुठल्याच पक्षाने इतक्या टोकाची विधाने केलेली नाहीत. सत्ताकारणामध्ये शिवसेनेइतक्याच गुंतलेल्या ना राष्ट्रवादी काँग्रेसने ना काँग्रेसने अशा असंस्कृत टिकाटिप्पणीचा मार्ग स्वीकारला आहे. यातून शिवसेनेचीच राजकीय अप्रगल्भताच दिसून येते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत अशी शापवाणी उच्चारली की भाजपच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातून होत आहे. राऊत यांचे हे विधान निषेधार्ह आणि कृतघ्नपणाचे देखील आहे. महाराष्ट्रातील मतदार त्यांना यथोचित उत्तरे देतीलच. त्यांनी हे लक्षात ठेवावे की कावळ्याच्या शापाने गुरे मरत नसतात.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …