नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सिडकोची नियोजित 26 नोव्हेंबरची घरांची सोडत रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र घरांची सोडत ही पूर्वनियोजित प्रशासकीय प्रक्रिया असल्याने ठरलेल्या दिवशीच म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजीच होईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली 814 आणि नवीन प्रकल्पातील 9249 घरांसाठी सिडकोने ऑनलाइन अर्ज मागविले होते. हे अर्ज सादर करण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत जवळपास एक लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घरांसाठी 26 नोव्हेंबर रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळी 10 वाजता संगणकीय सोडत काढण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. सोडतीचा कार्यक्रम पूर्वनियोजित प्रशासकीय कामाचा भाग आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर या ठरलेल्या दिवशीच सदर सोडतीचा कार्यक्रम होईल, असे सिडकोच्या पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.