पेण : प्रतिनिधी
रायगडमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. मुख्यत्वे पावसाची अखेर व हिवाळयाची सुरूवात या काळात फैलावणार्या या आजारावर मात करण्यासाठी स्वच्छता आणि त्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून जनतेने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतींनी ‘स्वच्छतेतून आरोग्यम धनसंपदे‘ कडे वाटचाल करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन डॉ.तुषार गावंड यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र डेंग्यू, मलेरिया व इतर तापाच्या साथीची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करून नागरिकांकडे स्वच्छतेसाठी आग्रह धरणे काळाची गरज असल्याचे मत डॉ. तुषार गावंड यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमिवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचेही कौतुक केले.