Breaking News

उंबरवाडी वाळीत प्रकरण चिघळणार

पीडित कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा

पाली : प्रतिनिधी

वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर जलदरीत्या कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा गाव कमिटीने वाळीत टाकलेल्या हाशा हंबीर यांनी दिला आहे. त्यामुळे हे वाळीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील उंबरवाडी (राबगाव) येथील हाशा नामा हंबीर या निवृत्त पोलीस कर्मचार्‍याला व त्यांच्या कुटुंबाला गाव कमिटीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यासंदर्भात हाशा हंबीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे गाव कमिटी सदस्यांविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, वाळीत प्रकरणातून होणार्‍या मानसिक त्रासामुळे हंबीर यांची विवाहित मुलगी पिंकी संदीप मांगे (29) यांनी आत्महत्येचा  प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उंबरवाडी गाव कमिटीतील 13 पंचांवर व अन्य दोघांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र आरोपींवर अजूनही कारवाई झाली नसल्याचे हाशा हंबीर यांचे म्हणणे आहे. आमचा पुरवणी जबाब घेण्यात यावा, तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी हंबीर यांनी केली आहे.

सुधागड तालुक्यातील उंबरवाडी सामाजिक बहिष्कार प्रकरणाच्या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे पुरावे तपासून योग्य ती कारवाई केली जाईल.

-अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, रायगड

उंबरवाडी वाळीत प्रकरणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामप्रवर्तक यांच्या समवेत गावात दोन्ही गटांची एकत्रित बैठक घेण्यात आली. गावात शांतता व सलोखा राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. वादाची मूळ कारणे शोधून सदर अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली सुधागड

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply