Breaking News

भावी पत्नीच्या उपचारासाठी पतीचे संस्थांना आवाहन

पनवेल : वार्ताहर

हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची अनेक प्रकरणे आपल्या कानावर येतात. लग्नानंतर मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार समाजात आजही पाहावयास मिळत असताना पनवेलमधील हरिग्राम येथे राहणार्‍या विजय मोरे या तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अश्विनी पंढरीनाथ शेळके (26) या तरुणीसोबत जमलेल्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचे फुप्फुस निकामी झाल्याची गंभीर बाब समोर आली, मात्र विजय आपल्या भावी पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

2018 मध्ये नोव्हेंबर महिन्यात विजय व अश्विनीचे लग्न जमले. लग्नाची तारीख निश्चित होण्यापूर्वी अश्विनीला निमोनियाचा त्रास सुरू झाला. हा आजार बळावल्याने शेळके कुटुंबीय आणि विजयने अश्विनीला नामांकित डॉक्टरांकडे नेले. या वेळी जानेवारी 2019 मध्ये तिचे फुप्फुस निकामी झाल्याचे निदान समोर आले. पेशाने आयटी इंजिनीअर असलेल्या विजयसह शेळके कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला, मात्र विजयने भावी पत्नीची साथ न सोडता तिला धीर दिला. फुप्फुस प्रत्यारोपणासाठी सुमारे 35 तर 40 लाखाचा खर्च येणार आहे. याकरिता स्वतः विजय निधी गोळा करण्यासाठी विविध ट्रस्टच्या पायर्‍या झिजवत आहे. अद्याप सुमारे 40 ते 50 संस्थांकडे त्याने मदत मागितली आहे. आठवड्यातून एकदा अश्विनीला डॉक्टरकडे तपासणीकरिता घेऊन जावे लागते. याकरिता शेळके कुटुंबीयांसोबत विजयही रुग्णालयात जातो. अश्विनी ठाणे येथील लोकमान्यनगर येथे राहते, तर विजय पनवेलमधील हरिग्राम या ठिकाणी राहतो. सध्या अश्विनी सुकापूर येथे भाड्याच्या खोलीत राहते. त्या ठिकाणी तिला कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.

लग्न जमण्यापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो, मात्र अवघ्या तीन महिन्यांत आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. तिच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. अश्विनीच्या उपचारासाठी संस्थांनी मदतीचा हात द्यावा, अशी विनंती विजय करीत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply