Breaking News

शपथविधी काळोखात नव्हे, रामप्रहरी झाला; रामाला विसरलेल्यांनी शिकवू नये!, भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात, पण जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? चोरून केलेले काम कोणते हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची चिरफाड केली आहे.

काळ्या गाडीतून जे नेते रात्री काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना भेटायला जातात, त्यांनी कोणते चांगले काम केले? काँग्रेसशी संधान साधले तर तो त्यांचा गोराबाजार आणि आम्ही बारामतीच्या पवारांशी सलगी केली ती म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही केलेला काळाबाजार? हे कसे काय असू शकते, असा सवाल आमदार शेलार यांनी राऊत यांना केला.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबाबत शेतकरी, तरुण, गृहिणी, व्यापारी, उद्योजक अशा सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. आम्ही जनतेला मानणारे आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो की, हे सरकार कालावधी पूर्ण करेल आणि जनतेच्या हिताचेच काम करेल, असा विश्वास आमदार शेलार यांनी व्यक्त केला.

राज्यपालांनी आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याचिका केली आहे. त्याचा निकाल येईलच, पण 170 पेक्षा जास्त मतांनी आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा दावाही आमदार शेलार यांनी या वेळी केला.

-आणीबाणीच्या वक्तव्यावरून टोला

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली त्याहीपेक्षा राज्यात नुकताच झालेला शपथविधीचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. त्याबाबत भाजप नेते आमदार आशिष शेलार म्हणाले की, यासाठी मी राऊत यांचे आभार मानतो. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयाला राऊत यांनी ‘काळा दिवस’ असे संबोधित केले. जे काँग्रेससोबत जात आहेत तेच काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांवर टीका करतात. पुढे ते काय करतील याचा विचार काँग्रेसनेच करावा, असा टोलाही आमदार शेलार यांनी लगावला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply