Breaking News

डम्पिंग ग्राऊंडचा कचरा नाल्यात

नेरळ परिसरात पसरली दुर्गंधी

कर्जत : बातमीदार

नेरळ गावातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अपुरे पडत असल्याने डम्पिंग ग्राऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्‍यापासून दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, गोळा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूने वाहणार्‍या नाल्यात टाकला जात असल्याने नाल्याची रूंदीदेखील कमी होत चालली असल्याची तक्रार केली जात आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत आणि परिसराचे नियोजन नेरळ विकास प्राधिकरण करीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या प्राधिकरणकडून विकासाचे नियोजन केले जात असून, वाढते नागरिकरण लक्षात घेऊनदेखील नेरळ गावात डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा आरक्षित केलेली नाही. त्यामुळे कर्जत-कल्याण रस्त्यालगत असलेल्या एक एकर जागेत नेरळ ग्रामपंचायत कचरा टाकण्याचे काम करीत आहे. त्या ठिकाणी सायंकाळी लावण्यात येणार्‍या आगीमुळे रात्रभर धुराचे लोट आणि दुर्गंधी या समस्या नेरळकरांना मागील काही वर्षापासून भेडसावत आहेत. 

आता ग्रामपंचायतीच्या ताफ्यात नवीन घंटागाड्या आल्या असून त्या गाड्यांमधून पूर्वीपेक्षा जास्त कचरा दररोज या कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. पावसाळ्यापासून ग्रामपंचायतीकडून तेथील कचरा खालून वाहणार्‍या नाल्यात सोडला जात आहे.  तो पाण्यासोबत वाहून जाण्याऐवजी नाल्यातच साठून राहत आहे. यासर्व प्रकारामुळे नाल्याची रुंदी दिवसेंदिवस कमी होऊ लागली असून, नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे.

नेरळमधील कचरा दररोज गोळा करून तो ग्रामपंचायतीमार्फत डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. ही पद्धती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी, नेरळ

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात असलेली एक जागा ग्रामपंचायतीसाठी मागत आहोत. त्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र जागेचे हस्तांतरण होत नसल्याने कचरा डेपो अधिकृतपणे हलविता येत नाही.

-अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ ग्रामपंचायत

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply