वाहनचालकांसह प्रवाशांचा सवाल

नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे ते रोहे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांसह प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
नागोठणे-रोहे मार्गातील नागोठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतचा रस्ता अलिबागच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून तेथून पुढील रस्ता महाड विभागाच्या हद्दीत आहे. विशेष म्हणजे आमडोशी फाट्यापासून रोहेपर्यंतचा रस्ता चकचकीत असला तरी, हा चार किलोमीटर अंतराचा रस्ता कायम खड्ड्यातच राहात असल्याने याचे नक्की रहस्य तरी काय, असा नागरिकांचा सवाल आहे.
नागोठणे-रोहे मार्गावरून रोहे, मुरुड तसेच पेण आगाराच्या दररोज सुमारे ऐंशी एसटी बसेससह हजारो दुचाकी, कार तसेच मालट्रकची जा-ये होत असते. रस्त्याला एक दोन फुटाचे खोल खड्डे जागोजागी पडले असल्याने वाहन चालक तसेच प्रवाशांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी व्याधींनी ग्रासले असल्याचे स्पष्ट होत आहे. तर, या रस्त्यावरून नियमित मार्गक्रमण करणार्या वाहनांना कायम दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरच चालू करण्यात येईल, अशी आश्वासने आतापर्यंत अनेकदा ऐकली असली, तरी प्रत्यक्षात दुर्लक्षच केले गेले असल्याने संबंधित विभागाने एखादा मुहूर्त शोधून या कामाला आतातरी सुरुवात करून वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper