Breaking News

बेकारांनो सावधान!

घरबसल्या पार्ट टाईम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एंट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा अशा जाहिराती आपण लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या आणि वर्तमान पत्रात नेहमी वाचत असतो. आज नोकरी मिळवणे ही मोठी समस्या झाली आहे. अनेक इंजिनियर, पदवीधर तरूण-तरूणी नोकरीसाठी धडपडताना पहात असतो. पालक देखिल आपल्या मुलांना नोकरी लागावी यासाठी पैसे द्यायला तयार असल्याचे आपण पाहत असतो. लाखो रुपये देऊन नोकरी न मिळाल्याने फसवल्याचे गुन्हे रोजचं पोलिस ठाण्यात दाखल होत असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो, तरीही रोज पुन्हा नवीन माणसांची फसवणूक होत असतेच… त्यामुळे या जाहिराती वाचल्यावर प्रत्येकाला एवढ्या झटपट पैसे कमावण्याची संधी साधण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही

घरबसल्या पार्ट टाईम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एंट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा अशा जाहिराती वाचून त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसलेली रिसेप्शनिस्ट तरूणी तुमचे स्वागत करते. सर, कामात आहेत तुम्ही जरा वेळ बसा असे सांगते एकजण तुम्हाला पाणी आणून देतो. आजूबाजूला नोटीस बोर्डवर मराठी पुस्तकांची कव्हर टाचणीने लावलेली असतात तुमच्यासारखे आणखी तीन-चारजण तिथे बसलेले असतात. काही वेळात आणखी काहीजण येतात. मग तुम्हाला केबिनमध्ये बोलावले जाते आतमध्ये बसलेली व्यक्ती तुमची विचारपूस करते कोठून आलात, काय करता तुमची थोडीशी कौटूंबिक माहिती विचारली जाते आणि रजिस्ट्रेशन फी म्हणून एक हजार  पासून 1500 रुपयापर्यंत भरायला सांगितले जातात. त्यानंतर पाच-सहा जणांच्या ग्रुपला एकत्र बसवून तेथील तरूणी तुम्हाला कामाची माहिती देते.

ती तरूणी तुम्हाला एक मराठी पुस्तक दाखवते याची कॉपी कागदावर पेनने  करून आणायची आहे. तुम्हाला कोरे पेपर आणि पेन आम्ही देऊ त्यावर रेषा मारून तुम्ही लिहायचे आहे. तुम्हाला एका पानाचे 20-30 रुपये मिळतील. त्यामध्ये चुका झाल्यास पैसे कापले जातील 10 पेक्षा जास्त चुका झाल्यास त्या पानाचे पैसे मिळणार नाहीत. काम दिसायला सोपे असते. कोणालाही वाटते आपण दिवसात सहज 15-20 पाने  लिहू शकतो म्हणजे 500-600 रुपये  घरबसल्या सहज मिळवू शकतो. सगळे काम करायला लगेच तयार होतात. मग तुम्हाला बाहेर जाऊन साहित्य घेण्यास सांगितले जाते. दुसरा ग्रुप आत येतो. तुम्हाला भरलेल्या पैशाच्या मोबदल्यात एक दोन रुपयाचा पेन, दोन डझन कोरे कागद आणि एका पुस्तकाची काही पाने दिली जातात. हे काम 15 दिवसात पूर्ण करा मग पुढील काम मिळेल. दिलेले काम तपासल्यावर त्याचे पैसे आठवड्याने तुम्हाला मिळतील असे सांगितले जाते. 

काम घेऊन खुशीत तुम्ही घरी येता. मग कामाला सुरुवात केल्यावर कळते की बारीक टाईपमध्ये असलेल्या पुस्तकाची कॉपी करणे सोपे नाही. दोन तासात एक पान पूर्ण होते. त्यामध्ये अनेक चुका झालेल्या असतात म्हणजे दोन तास काम करून दोन रुपये ही मिळू शकत नाहीत हे लक्षात येते. मग आपले डोळे उघडतात की आपण दोन रुपयाचे पेन आणि दोन डझन कागदासाठी हजार किंवा जास्त रुपये देऊन पुस्तकाची पाने म्हणजे रद्दी घेऊन आलो आहोत. पण या ऑफिस टाकून बसलेल्या व्यक्तीला रोज 10 माणसे तरी मिळाली असे धरले तर दहा हजार कोठेच गेले नाही. महिना दोन लाख 60 हजार त्यापैकी पगार, भाडे आणि इतर खर्च 60 हजार गेले तरी दोन लाख रुपये मिळत आहेत. बेकारांना फसवणुकीचा हा धंदा सध्या जोरात सुरू आहे, याकडे पोलीस मात्र कानाडोळा करीत आहेत.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply